Fri. Feb 21st, 2020

कसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा…

लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील शिंगाडे ह्या एकाच कुटुंबातील चौघेजण देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत होते ही बाब जळकोटवासियांसाठी अभिमानाची असून त्याहीपेक्षा सबंध देशाला हेवा वाटेल असे कृत्य रोहितने मृत्यूनंतरही केले आहे. वाढदिवसाच्या दिवशीच रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरीही रोहितने देशवासीयांना डोळे, हृदय आणि किडनी या अवयवांचे दान करून  गिफ्ट दिल्याने इतर पाच जणांना जीवदान मिळणार आहे. जिवंतपणी देशाच्या सीमेवर ठाण मांडून रक्षण करणारा रोहित मृत्यूनंतरही अवयवरुपाने आजही जिवंत आहे. आज गुरूवारी दुपारी त्याच्या पर्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

29 वर्षीय रोहित शिंगाडे हा गेल्या 11 वर्षांपासून लान्स नाईक या पदावर राहून देशाची सेवा करत होता. सियाचिन भागात कर्तव्य बजावत असताना बर्फाचा झालेला वर्षाव आणि रक्त गोठणाऱ्या थंडीने डोक्याची नस तुटल्याने मंगळवारी दुर्देवी मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतरही लागलीच रोहितचे हृदय प्रात्यारोपण केल्याने मृत्यूच्या दाढेत असलेल्या एका जवानाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आज रोहित जगात नसला तरी त्याच्या हृदयाचे ठोके धडधडतच राहाणार आहेत. तसंच डोळ्याच्या माध्यमातून जग पाहणार आहेत. एवढंच नव्हे, तर त्याच्या दोन्ही किडनी इतरांच्या उपयोगी पडणार आहेत.

ज्या शहरात सैन्यात भरती होण्याची परंपरा शिंगाडे कुटुंबियांनी सुरू केली त्याच परिवारातील रोहितने घराचेच नाही तर जळकोट तालुक्याचे नाव अजरामर केले आहे. त्याचा मृतदेह जळकोट येथील गुरूदत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हजारो नागरिकांनी दर्शन घेतले असून त्याच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. शहीद रोहितच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, सहा बहीणी, दोन भाऊ असा परिवार आहे. ‘भारत माता की जय’, ’वीर जवान अमर रहें’च्या घोषणांमध्ये शासकीय इतमामात रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आपल्या मृत्यूनंतरही अनेकजणांना नवं आयुष्य देणाऱ्या रोहितने खऱ्या अर्थाने मृत्यूलाही हरवलंच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *