Wed. May 18th, 2022

दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला लक्षवेधी

भारताचा आज 73 वा प्रजासत्ताक दिन आहे. देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्याने यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. यासोबतच भव्य परेडही पाहावयास मिळाली. यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि देशातील इतर मान्यवरही उपस्थित होते
. सालाबादप्रमाणे याही वर्षी दिल्लीच्या राजपथावर संचालनाचा कार्यक्रम पार पडला. या संचलनात देशभरातील १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे एकूण २१ चित्ररथ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ह्यात महाराष्ट्राचा चित्ररथ हा खास आकर्षणाचे कारण बनला. दरवर्षी दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्र आपलं वेगळेपण जपत असतो. आजवर महाराष्ट्राने अनेक संस्कृतीप्रधान किंबहुना महाराष्ट्राचं वेगळेपण दर्शवणाऱ्या कलाकृती राजपथावर सादर केल्या आहेत. कधी महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती, कधी महाराष्ट्राचं साहित्य, कधी महाराष्ट्राची संतपरंपरा तर कधी शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासासोबत महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तावर सादर झाला आहे. ह्यावर्षी म्हणजेच ७३ व्या प्रजासत्ताक दिनीसुद्धा महाराष्ट्राने आपले वेगळेपण जपत राज्याच्या चित्ररथातून साताऱ्यातील ‘कास’ पठाराचं चित्र दाखवलं. महाराष्ट्राच्या या चित्ररथाला प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे.
महाराष्ट्राच्या यंदाच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आला असून ‘महाराष्ट्रतील जैवविविधता मानके’ या विषयाशी निगडित महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. चित्ररथावर पाच जैवविविधता माणकं आहेत. ज्यात महाराष्ट्रातील विविध औषधी वनस्पती आणि प्राण्यांचा समावेश आहे. यात सुमारे १५ प्राणी, २२ वनस्पती आणि रंगीबेरंगी फुले चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली.

“वनराईचा राजा आंबा, ताम्हण आणि मस्त शेकरू
हरियालाचे रूप देखणे, निळे जांभळे फुलपाखरू
अथांग सागर रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे
गवत फुलांच्या रंगवरती महाराष्ट्राचा जीव जडे
जपतो आम्ही जैववारसा, जपतो आम्ही वसुंधरा
झाडे लावू, झाडे जागवू, हाच आमुचा धर्म खरा,”

अशा गाण्याच्या जयघोषात झाडे लावा, झाडे जगवा असा महत्वाचा संदेश सदर चित्ररथातून देण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर ह्याच्या संकल्पनेतून तयार झालेला हा चित्ररथ संपूर्ण देशाला निसर्गप्रेमाचा संदेश देतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.