‘मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे सल्ला देतात त्यांना उत्तरं दे यातच वेळ घालवला’
‘संपूर्ण कोरोना काळात एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे’, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या का वाढत आहे? महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती’, असं सांगत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
‘मुख्यमंत्र्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती. नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यानंतर सरकार काय व्यवस्था करणार आहे? किंवा राज्यातील इतर भागात संख्या वाढत असताना खाटा का मिळत नाही, योग्य व्यवस्था का नाही याचं उत्तर द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला’, अशी टीका फडणवीसांनी केली.
‘कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही. काय उपाययोजना करणार सांगितलं नाही. लॉकडाउन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागंत. पण तो अपवाद आहे, नियम नाही. लॉकडाउन करायचा असेल तर प्रत्येकाचा विचार करावा लागेल’,असंदेखील फडणवीस यावेळी म्हणाले.