रंगीबेरंगी फुलांनी बहरलं कास पठार, पर्यटकांची गर्दी
विध रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत सातारा येथील कास पठारावर फुले बहरली आहेत. येथे एक दोन नव्हे, तर असंख्य रानफुलांच्या रंग सोहळ्यात कास पठार न्हावून निघायला सुरुवात झाली आहे.

विविध रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत सातारा येथील कास पठारावर फुले बहरली आहेत. येथे एक दोन नव्हे, तर असंख्य रानफुलांच्या रंग सोहळ्यात कास पठार न्हावून निघायला सुरुवात झाली आहे. सातारा शहरापासुन 22 किलोमीटर अंतरावर असणारया कास पठारावर सध्या वेगवेगळी रंगबेरंगी फुले येण्यास सुरुवात झाली असुन या पठारावर आठवडाभरात चांगला फुलांचा बहर पर्यटकांना पहायला मिळणार आहे. सध्या कास पठारावर 140 प्रजातींची रानफुले निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे.
कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचे नामांकन मिळाले आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार आता विविध रानफुलांनी बहरू लागले आहे. माळरानावर बहरलेले रानफुलांच्या ताटव्यांचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. त्यामुळे फुलांच्या बहराबरोबर पर्यटनाला बहर आला आहे. जिल्ह्यासह देश, विदेशातील पर्यटकांची पावले आता कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहेत.
सध्या कास पठारावर स्पंद तेरडा, चवर, डीपकांडी, टूथब्रश, आभाळी, निलिमा, अबोलिमा, नभाळी, पिवळी सोनकी, गुलाबी तेरडा, रानहळद पांढरी, पिवळी, लाल, तपकिरी, कापरू, सीतेची आसवं, गेंध (धनगर गवत) रानमोहरी, रानवागं, वाई तुरा, अशी 130 ते 140 प्रकारची फुले दिसू लागली आहेत. त्यामुळे पठारावर विविध फुलांच्या रंगीबेरंगी छटा पाहावयास मिळत आहेत. सध्या कास पठारावर तेरडा, गुलाबी, पिवळ्या व पांढर्या रंगांची फुले पर्यटकांची आकर्षण ठरू लागली आहेत.