Fri. Aug 12th, 2022

राज्यभर नवरात्रीचा उत्साह, विविध मंदिरांत घटस्थापना

श्री रेणुकामाता – चांदवड

उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर विविध राज्यातील भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या चांदवड निवासनी, राजराजेश्वरी, कुलस्वामिनी, श्री रेणुकामाता मंदिर नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले असून नेहमी प्रमाणे यंदाही भाविकांना सर्वासोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. चांदवड शहरापासून अवघ्या काही अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून श्री रेणुका मातेचे भव्य मंदिर असून सह्याद्रीच्या पर्वत रांगातील एका डोंगराच्या गुहेत हे मंदिर आहे. या मंदिरात मातेचे शीर आहे तर धड माहूर येथे आहे. मंदिर परिसरात घट स्थापना करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली

कोल्हापुर – अंबाबाई

नवरात्रोत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापुरात येतात. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झालीय. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये तोफेच्या सलामीने घटस्थापनेचा विधी पार पडला. नऊ दिवस अंबाबाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून नऊ दिवस विविध रूपांमध्ये अंबाबाईची पूजा मांडण्यात येणार आहे.

येवला – महाकाली

येवला तालुक्याची ग्रामदेवता महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वतीचे रूप असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सवास आज पासून सुरुवात झाली आहे, मंदिरापुढे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून आरती करण्यात आली. तसेच आमदार छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांच्यासह जगदंबा मातेचे दर्शन घेतले. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या जगदंबा मातेच्या ठिकाणी घट बसणा-या भाविकांसाठी मोठा मंडप टाकण्यात आला असून मंदीरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.

तुळजाभवानी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली आहे. मंगल वादय आणि मंत्रोच्चारात घटस्थापना झाली आहे. यावेळी लाखो संख्येने भाविक उपस्थित आहेत.

नागपूर – महालक्ष्मी

नागपूरलगत कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवी विदर्भातील शक्तिपीठांपैकी एक आहे. आज नवरात्रेच्या घटस्थापनेच्या निमित्त येथे सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
स्वयंभू देवीच्या रूपाची पहाटे चार वाजता महाआरती झाली की भक्तांच्या दर्शनाला सुरवात होते जे दिवसरात्र दर्शन सुरु असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.