Thu. Dec 2nd, 2021

‘रामसेतू’ चित्रपटात काम करणाऱ्या ४५ सहकलाकारांनाही कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बॉलिवूडमध्येसुद्धा कोरोनाचं मोठं संकट घोंगावताना दिसत आहे. रविवारी अभिनेता अक्षय कुमारने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. अक्षय कुमार ‘राम सेतू’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. त्यानंतर आता ‘राम सेतू’च्या सेटवर ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

‘राम सेतु’च्या मडमधील सेटवर आज चित्रीकरणाच्या कामाला सुरुवात होणार होती. मात्र अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यात १०० जणांपैकी ४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिने एंप्लॉइजचे सचिव अशोक दुबे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ‘राम सेतू चित्रपटाची संपूर्ण टीम सर्व प्रकारची खबरदारी बाळगत आहे. दुर्दैवाने ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सर्व विलगीकरणात आहेत.’, असं दुबे यांनी सांगितलं.

अक्षय कुमारसह ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ५ एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारं ‘राम सेतू’ सिनेमाचं चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. जवळपास १५ दिवस चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *