Sun. Apr 18th, 2021

100 वर्षं… जालियनवाला बाग हत्त्याकांडाची !

भारताची सद्यस्थिती पाहून अनेकजण आजही ब्रिटीश सरकारच हवं होतं, अशी हळहळ व्यक्त करतात. ब्रिटिशांच्या काळात भारतात खूप सुधारणा झाल्या. जास्त स्वातंत्र्य मिळालं. सोयी सुविधा वाढल्या. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. रुढी- परंपरेच्या जोखडातून सुटका झाली, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन वाढला… असे एक ना अनेक दावे केले जातात. यात काही अंशी तथ्यंही आहे. मात्र ही केवळ ब्रिटीश राजची एकच बाजू. अन्यथा या ब्रिटिश राजपासून सुटका करण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी प्राणांची आहुती का दिली असती? इंग्रज सरकारच्या गुलामीतून सुटका व्हावी, यासाठी त्यांनी अहिंसा किंवा सशस्त्र क्रांतीचा मार्ग का निवडला? ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेल्या अनेक अनन्वित अत्याचारांपैकी इतिहासातून कधीच पुसलं न जाऊ शकणारं रक्तलांच्छित पान म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या भीषण दुर्घटनेबद्दल आपण शालेय पुस्तकांतून वाचलं असेल. आज 13 एप्रिल 2019 रोजी याच भयाण घटनेला एक शतक पूर्ण झालंय.

 

100 वर्षांपूर्वी याच दिवशी…

ब्रिटिश सरकारने लागू केलेल्या रौलट कायद्याविरोधात भारतीय जनतेमध्ये असंतोष होता.

अत्यंत संसदीय पद्धतीने याविरोधात ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात होता.

पंजाबच्या अमृतसर शहरातील सुवर्ण मंदीर गुरुद्वारेलगत जालियनवाला बाग आहे.

सुवर्ण मंदिर अर्थातच हरमंदिर साहेब गुरुद्वारा ही शीख समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र स्थान आहे.

13 एप्रिल रोजी पंजाबमधील अत्यंत महत्त्वाचा पारंपरिक सण ‘बैसाखी’ होता.

या सणानिमित्त अमृतसरच्या गुरुद्वारेत शीख बांधव अकाल तख़्तपुढे माता टेकायला येत होते.

संध्याकाळी बैसाखीनिमित्त जालियनवाला बागेत जोरदार उत्सव साजरा होत असे.

मात्र 1919 साली रौलट कायद्यामुळे या उत्सवावर विरजण पडलं होतं.

भांगडा किंवा तत्सम नृत्य गायनाचा कार्यक्रम करण्याऐवजी सर्वांनी एकत्र जमून रौलट कायद्याचा निषेध करायचं ठरवण्यात आलं.

आपला आवाज ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचावा आणि हा व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणार कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी यामागे अपेक्षा होती.

आपल्या उत्सवाचं celebration समाजाच्या आणि देशाच्या भल्याकरता करण्याचं शीख बांधवांनी उचलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल होतं.

मात्र याची खबर ब्रिटिशांना लागताच जमावबंदीचा आदेशच देण्यात आला.

मात्र अशा प्रकारे जुलमाने प्रत्येक गोष्टीवर निर्बंध लादले, तर एकतर गुलामी किंवा सशस्त्र क्रांती असे दोनच पर्याय भारतीयांपुढे उरले असते.

मात्र सामान्य पंजाबी बांधवांनी या दोन्ही मार्गांपेक्षा निःशस्त्र एकत्र जमून केवळ निषेध नोंदवण्याचा अहिंसक मार्ग स्वीकारला.

संधाकाळी जालियनवाला बागेत मोठ्या प्रमाणावर शीख समुदायाचे लोक जमले.

अत्यंत शांतपणे त्यांनी आपले विचार व्यक्त करत रौलट कायद्याला विरोध केला.

मात्र ब्रिटिश सरकारने या प्रसंगी आपली Fascist वृत्ती दाखवून दिली.

मायकल ओडवायर या अधिकाऱ्याने जनरल डायर या नृशंस अधिकाऱ्यासोबत एक तुकडी जालियनवाला बागेत पाठवली.

या जालियनवाला बागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रवेश करण्यासाठी एकच चिंचोळा मार्ग आहे.

छोट्या दरवाज्यातून बागेत शिरल्यावर पुन्हा त्याच एका दरवाज्याने बाहेर पडावं लागतं.

बैसाखीनिमित्त जमलेला निःशस्त्र महिला पुरुषांचा जत्थाही याच दरवाजाने आत आला होता आणि याच दरवाजातून बाहेर पडणार होता.

मात्र क्रूर जनरल डायरने या दरवाजातून तुकडी आत घुसवल्यावर हा दरवाजाच अडवला.

बागेत चहुबाजूंनी शस्त्रसिद्ध सैनिकांनी निःशस्त्रपणे उत्सव साजरा करणाऱ्या आबालवृद्धांना घेरलं.

मायकल ओडवायरच्याच सांगण्यावरून जनरल डायरने आपल्य़ा सेनेला गोळीबाराची आज्ञा दिली आणि सैनिकांनी बेछुट गोळीबार करत हजारो निःशस्त्र महिला पुरूष, लहान बालकं, म्हातारे कोतारे यांचे प्राण घेतले.

आपला प्राण वाचवण्यासाठी या केविलवाण्या जमावाकडे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. तो एकमेव दरवाजा अडवण्यात आला होता. उंच भिंतीवंवरून उडी मारून जे लोक जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावरही गोळ्या चालवल्या गेल्या.

अनेक महिलांनी आपला आणि आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी बागेतील विहिरीत उड्य़ा मारल्या. जेणेकरून त्या अमानुष गोळीबारापासून आपण सुरक्षित राहू.

सलग 20 मिनिटं चाललेल्या या गोळीबाराने आसमंत व्यापून गेला.

हजारो गोळ्यांचा अव्याहत सुरू असणारा कानठळ्या सबवणारा आवाज, माता भगिनींच्या केविलवाण्या किंकाऴ्या, लोकांची अर्जवं, लहान बाळांच्या रडण्याचे थरकाप उडवणारे आवाज यांनी परिसर हादरून गेला. सारा आसमंत धुराने व्यापून गेला होता. संपूर्ण बागेत प्रेतांचा खच पडला होता. जखमींचे विव्हळण्याचे आवाज, क्लांत शरीरांमधून निघणारे कण्हण्याचे हेलावून टाकणारे स्वर, दडपलेल्या उरातून दाटून आलेल्या कंठाने केलेला रडण्याचा प्रयत्न, मदतीची याचना करण्याचीही शक्ती इरली नसलेली छिन्नविछिन्नं गात्रं यांनी जालियनवाला बागेतील बैसाखी सुतकी बनून गेली.

शेकडो लोक मृत्यू पावले होते. दीड हरारांहून अनेक जण जखमी झाले होते.

भिंतीवर चढून जाऊन प्राण वाचवू पाहणाऱ्या लोकांना वेचून मारताना भिंतीत घुसलेल्या 28 गोळ्या आजही त्या भिंतीच्या आत आपल्या खुणा आजही तशाच ठेवून आहेत.

ज्या विहिरीत उड्या मारून आपला जीव आणि आपल्या अश्राप तान्हुल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या विहिरीतून नंतर 120 प्रेतं बाहेर काढण्यात आली. या विहिरीला आता ‘शहिदी कुवाँ’ असं संबोधलं जातं.

 

दुसरा पर्यायच नव्हता का?

 

जमलेल्या निःशस्त्र समुहाला हाकलण्याची संधी प्रत्यक्षात डायरकडे होती.

ज्या मार्गाने हे शीख बांधव आले होते, त्याच मार्गाने ते परत गेले असते. जर ते गेले नसते, तरी त्यांच्यापासून कुणालाही धोका नव्हता.

जर तसं वाटल्यास इतर अनेक मार्गांनी या शीखांचा आटकाव करणं शक्य होतं.

मात्र हुकुमशाही वृत्तीच्या क्रूर जनरल डायरने दुसरा कोणताही पर्याय या जमलेल्या भारतीय नागरिकांना देण्याचा विचार केला नाही.

त्याला केवळ या सर्वांना ठार करून भारतीय जनतेला धडा शिकवायचा होता.

या हत्याकांडामुळे भारतीय जनता पूर्णपणे हादरून जाईल, पुन्हा ब्रिटिशांविरोधात ब्र ही उच्चारणार नाही, असा जनरल डायर आणि मायकल ओडवायरचा कयास होता.

मात्र तसं झालं नाही. याच घटनेने अनेक क्रांतीच्या मशाली पेटल्या. अनेक आक्रोश झेललेल्या जालियनवाला बागेतील मूठभर माती एक मुलगा आपल्याकडच्या बाटलीत भरून घेऊन आला. ती बाटली सतत आपल्या जवळ बाळगून या घटनेला कारणीभूत ब्रिटिशांना संपवण्याचा निर्धार या मुलाने केला. तो निर्धार या मुलाने आपल्या परीने आमलातही आणला. हा मुलगा म्हणजेच शहीद भगत सिंग…

 

जनरल डायरला भविष्यात शांत मृत्यू आला. मात्र जालियनवाला बाग हत्याकांडाला कारणीभूत मायकल ओडवायरला मात्र आपल्या अमानुषतेची किंमत चुकवावी लागली. त्या क्षणी नव्हे, पण इंग्लंडला परत गेल्यावर अनेक वर्षांनी एका भारतीय तरुणाने त्याला गोळ्या घालून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. हा तरूण होता, शहीद उधम सिंग…

आज स्वातंत्र्यानंतरही ही बाग अद्याप तशीच आहे. आजही येथे एकच दरवाजा आहे. अमर ज्योत इथे अकंड तेवत आहे. इथे स्मारक उभारण्यात आलं आहे. अनेक लोक येऊन या जागेचं दर्शन घेतात. निष्पाप भारतीयांवर निष्ठुर इंग्रजांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांचं स्मरण करून मृतांना श्रद्धांजली वाहतात.

जालियनवाला बाग हत्याकांडाची खुद्द अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही निर्भत्सना केली.

हे हत्याकांड अमानुष असल्याचं काही ब्रिटिशांनीही मान्य केलं.

या हत्याकांडाबद्दल ब्रिटिश सैनिकांनी नंतर माफीही मागितली.

निःसस्त्र निष्पाप लोकांना ठार मारण्याचं आपलं कृत्य अत्यंत लाजिरवाणं असल्याचं अनेक सैनिकांनी कबूल केलं.

2013 मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून य़ांनी जालियनवाला बागेला भेट देऊन येथील अभिप्राय पुस्तिकेत ब्रिटिशांकडून झालेल्या नरसंहाराबद्दल दुःख व्यक्त केलं.

 

ही घटना मानवी इतिहासातील एक काळी घटना म्हणून आज ओळखली जाते. ब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अत्याचारांचं हे जिवंत उदाहरण होतं. या घटनेला आज 100 वर्षं पूर्ण झाली. आता स्वातंत्र्य आहे. आजही लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात असल्याचं कधीतरी म्हटलं जातं. काही घटनांवरून सरकारवर टीका होते. भारताने म्हणावी तशी प्रगती केली नाही, याचं शल्यही आहे. मात्र आज ब्रिटिशांची सत्ता असती, तर जालियनवाला बागेसारख्या किती नृशंस घटना घडल्या असत्या, याची मोजदाद कुणी ठेवली असती का? आचार विचारस्वातंत्र्यावरील बंधनांवर एक शब्द उच्चारण्याची तरी बिशाद असती का? भारतीय स्वातंत्र्यसेनानींच्याच नव्हे, एका पिढीच्या रक्ताचं सिंचन होऊन हे स्वातंत्र्य देशाला मिळालंय. त्याचा अभिमान बाळगणं, ते चिरायू व्हावं यासाठी झटणं हेच आता आपलं काम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *