मुंबई विद्यापीठाच्या १७८ महाविद्यालयांना प्राचार्य नाहीत

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालयांना प्राचार्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर २३ महाविद्यालयाची माहिती विद्यापीठाकडे नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षक मान्यता कक्षाने ३८ पानाची यादी दिली होती. या यादीमध्ये एकूण ८०८ महाविद्यालयाची नोंद असून यापैकी ८१ महाविद्यालयांमध्ये संचालक उपलब्ध आहेत. तर उर्वरीत ७२७ महाविद्यालयांपैकी १७८ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य नाहीत तर २३ महाविद्यालयाची माहिती विद्यापीठाकडे नसल्याचे समोर आले आहे.
अनिल गलगली यांच्या मते, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि जर महाविद्यालयांमध्ये प्राचार्य नाहीत तर अशा परिस्थिती नवीन अभ्यासक्रमाची परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल उपस्थित करत त्यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.