देशात शनिवारी ४३ हजार ९१० नवे कोरोनाबाधित

देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची भीतीदेखील तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. अद्यापही रोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, देशात मागील काही दिवस दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर आता शनिवारपासून पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. देशभरात मागील शनिवारपासून ४३ हजार ९१० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ३,१९,३४,४५५ झाली आहे. देशात ४,०६,८२२ सक्रिय रूग्ण असून, एकूण ४,०६,८२२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, रविवारपर्यंत देशात ४,२७,८६२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.