राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे ४५ रुग्ण

मुंबई: राज्यात कोरोना डेल्टा प्लस विषाणूचे ४५ रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतील एका रुग्णाचा मृत्यू वगळता सर्व रुग्णांना सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. विषाणूंचे जनुकीय क्रमनिर्धारण अभ्यासण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात येत असलेल्या सेंटिनल सर्वेक्षणात प्रत्येकी पाच प्रयोगशाळा आणि रुग्णालयांकडून दर १५ दिवसांनी १५ नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेला पाठविण्यात येतात, तर प्रत्येक जिल्ह्य़ातून १०० नमुने सीएसआयआर संस्थेला पाठविण्यात येत आहेत.
डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये १९-४५ वयोगटातील २०,१८ वर्षांखालील सहा, तर ६० पेक्षा अधिक वयाच्या पाच व्यक्तींचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार वाढू नये, यासाठी रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत.