बच्चे कंपनीचे किशोर मासिक झाले पन्नास वर्षांचे
अगदी पूर्वीपासून महाराष्ट्रातील लहानग्याचे आवडते मासिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘किशोर’ मासिकाने यंदा पन्नाशीत पदार्पण केले आहे.

शशांक पाटील, मुंबई : – अगदी पूर्वीपासून महाराष्ट्रातील लहानग्याचे आवडते मासिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘किशोर’ मासिकाने यंदा पन्नाशीत पदार्पण केले आहे. मागील पन्नास वर्षांपासून किशोर मासिक बच्चे कंपनीचे मनोरंजन करत असून सध्याच्या मोबाईल आणि संगणकाच्य़ा युगातही किशोर मासिकाची लोकप्रियता बच्चेकंपनीत कायम आहे.
मागील काही वर्षात मोबाईलचा आपल्या जीवनावर इतका परिणाम झाला आहे की, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण सतत मोबाईलमध्ये डोकं घालून असतात. मोबाईलमध्येच विविध पुस्तक, लेख मिळत असल्यानं सद्या मासिकांकडे वाचकांचे दुर्लक्ष होत असल्याचं ही दिसून येतंय. मात्र अशा मोबाईल आणि संगणकाच्या जगातही किशोर या बालमासिकानं आपला चाहतावर्ग कायम ठेवत पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत. उन्हाळी, दिवाळी सुट्टीमध्ये लहान मुलं आतुरतेने वाट पाहणाऱ्या किशोर मासिक म्हणजे बच्चे कंपनीसाठी एक पर्वणीच असते.
असे आहे ‘किशोर’
सन १९७१ मध्ये १४ नोव्हेंबर या बालदिनाचे औचित्य साधून पहिल्यांदा प्रकाशित केलेले किशोर मागील पन्नास वर्षांपासून बालकांचे मनोरंजन करत आहे. पहिल्या अंकापासून मुखपृष्ट आणि आतील चित्रे हे ‘किशोर’चे मुख्य वैशिष्टय आहे. प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी किशोरच्या पहिल्या अंकाचे चित्र रेखाटले होते.
किशोरमध्ये काय विशेष
बालंकासाठी प्रसिद्ध किशोर मासिकात कथा, कविता, कोडी, विज्ञान, तंत्रज्ञान यासंबधीचे विविध लेख असतात. ज्यात विशेषत: पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, शांता शेळके, नरहर कुरुंदकर, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांसारख्या दिग्गजांची साहित्य लहान मुलांना समजेल अशा भाषेत प्रसिद्ध केले जाते.