तेलंगणात कोरोनाचे ६ बळी, दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमात झाले होते सहभागी

७ एप्रिलपर्यंत आपलं राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दिल्ली जवळील निजामुद्दिन परिसरात झालेल्या ‘तबलिगी जमात’ या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या कार्यक्रमात सुमारे २००० लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एकाच इमारतीतील २४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
हा धार्मिक कार्यक्रम संपल्यावर लोक आपआपल्या राज्यात निघून गेले. त्यानंतर कार्यक्रमातील ६ सहभागींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यातील जम्मू-काश्मीरमधून या कार्यक्रमासाठी आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाची बाब समोर आली. तेलंगण, केरळ, पश्चिम बंगालमधील अनेकांना या कार्यक्रमानंतर कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
या गोष्टीचा खुलासा झाल्यापासून परिसरातील लोकांना क्वारंटाईन केलं गेलं आहे. दिल्ली पोलिसांनी निजामुद्दिन परिसरात सील केलं आहे. सुमारे २०० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली.