Mon. Feb 24th, 2020

पुण्यामध्ये पतंगाच्या मांजाने तोडला मुलाच्या आयुष्याचा दोर

पुण्यामध्ये पतंग उडवताना अडकलेला मांजा काढण्यासाठी गेलेला अकरा वर्षाच्या मुलाचा जलशुध्दीकरणाच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी वडगाव येथील तुकाईमंदीर टेकडीवर ही घटना घडली.

अथर्व बापू गोरे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत सिंहगडरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अथर्व हा हिंगणे खुर्द येथील जगताप महापालिका शाळेत पाचवीमध्ये शिकत होता. रविवारी सकाळी घराजवळ अथर्व हा त्याच्या लहान भावाबरोबर पतंग उडवीत होता. पतंग उडत असताना त्याचा मांजा जवळच तुकाईमंदीरावरील टेकवडीवर जलशुध्दीकरणाच्या टाकीला अडकला.

त्यानंतर अथर्व आणि त्याचा लहान भाऊ मांजा काढण्यासाठी तेथे गेले. त्यानंतर टाकीवर चढून अथर्व मांजा काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा तोल जाऊन जलशुध्दीकरण करण्याच्या पाण्याच्या टाकीत पडला.

मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्थवला पाण्यातून बाहेर काढले.

अथर्वच्या जाण्यामुळे परिसराच एकच शोककळा पसरली आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *