नवजात अर्भकाच्या आईचं Tweet, आणि लहान बाळासाठीच्या वस्तू घेऊन ठाकरेंचे कार्यकर्ते दारात हजर

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे नवजात बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा बंद आहे. तेव्हा किमान जन्माला आलेल्या बाळांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा व्हावा, अशी मागणी चंद्रपूरच्या एका मातेने Twitter वरून केली. तिने आपल्या ट्वीटमध्ये CMO ला देखील टॅग केलं. विशेष म्हणजे या Tweet ची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून या मातेला ताबडतोब मदत पोहोचवण्यात आली. मीरा अंबरकर (पूनम देशपांडे) Tweet करणाऱ्या महिलेचं नाव असून गेल्याच महिन्यात या महिलेने मुलाला जन्म दिलाय.
मीरा अंबरकर यांनी १० एप्रिल रोजी सकाळी Twitter वर आपली व्यथा मांडली. या Tweet मध्ये त्यांनी CMO ला टॅग केलं. काही वेळातच या ट्वीटची दखल घेण्यात आली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयातून मीरा यांना फोन आला. त्यांची पूर्ण माहिती आणि पत्ता घेतला. त्यानंतर काही वेळातच आदित्य ठाकरे यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयातून एक व्यक्ती थेट बेबीशॉपकीपर घेऊन अंबरकर यांच्या घरी पोहोचला आणि अंबरकर यांच्या नवजात अर्भकासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू त्यांना देण्यात आल्या.
लहान शिशूंसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये धरण्यात आला नसल्यामुळे अशा अडचणी होत आहेत. बाळांसाठी उपयोगी वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्याचा विचार मुख्यमंत्री कार्यालयाने सुरुवातीला केला होता. मात्र लोक तेथे गर्दी करतील अशी शंका असल्यामुळे ही दुकानंही बंद करावी लागली.
मात्र सद्यपरिस्थितीत नवजात अर्भकांना आणि त्यांच्या मातांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ‘न्यू बॉर्न बेबी शॉप’ उघडी ठेवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने यावर उपाय म्हणून थेट लहान बाळांच्या घरापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे.