राजकारणाची चंदेरी दुनिया….
शिवबंधन बांधून घेतलेल्या उर्मिला मातोंडकर…

शशांक पाटील , जय महाराष्ट्र, मुंबई : सध्याच्या जगमगत्या जगात ‘रिअल’ जीवनापेक्षा ‘रील’ जीवनाचाच तरुण पिढीवर जास्त प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. अर्थात फिल्मी दुनियाच लोकांना जास्त भावते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून प्रत्येक राजकीय पक्षात नट-नट्यांचा सहभाग आहे. मग त्या तामिळनाडूच्या राजकारणातील लेडी थलायवा मानल्या जाणाऱ्या जयललिता असो किंवा नुकत्याच शिवबंधन बांधून घेतलेल्या उर्मिला मातोंडकर.
सिनेकलाकारांच राजकारणाशी नातं हे काल परवाचं नसून बऱ्याच दशकांपासूनचं आहे. यात साऊथच्या राजकारणावर सिनेकलाकारांचा मोठ्या प्रमाणात दबदबा असल्यांच पाहायला मिळालं आहे. यात एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांची नावे प्रामुख्याने समोर येतात. तसंच बॉलिवुडमध्ये सुनिल दत्त, दिलीपकुमार, विनोद खन्ना, अनुपम खेर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी अशा जेष्ठ कलाकारांसोबत आजकालच्या तरुण कलाकारांना देखील राजकारणात रस असल्याचं दिसून येत आहे. याचाच प्रत्यय मंगळवारी देखील आला मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकं काम केलेल्या ‘मराठमोळ्या’ अभिनेत्री उर्मिला यांनी काँग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला.

२०१९ साली लोकसभा निवडणूकीत काँग्रसेकडून उभ्या राहत दारुन पराभूत झालेल्या उर्मिला यांना मविआचे सरकार येताच आपल्या मराठी अस्मिेतेची जाग आली आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न, उत्तरेतील शेतकरी आंदोलनाचे महाराष्ट्रात उमटू लागलेले पडसाद, वाढीव वीज बिलामुळे हैराण झालेले सामान्य नागरिक आणि या सर्वात उर्मिला यांच्या प्रवेशाचा होत असलेला उदोउदो खरच थोडा विचार करायला लावणारा आहे. आतापर्यंत उर्मिला यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता त्यांनी २७ मार्च, २०१९ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं. त्यानंतर लोकसभेत दारुण पराभवानंतर आणि काँग्रेसमधील कलहांमुळे उर्मिलाने १० सप्टेंबर, २०१९अशा अवघ्या सहा महिन्यात काँग्रेसला राम-राम ठोकला. त्यानंतर काही काळ राजकारणापासून लांब राहिलेल्या उर्मिला यांनी १ डिसेंबरला शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान उर्मिलाने या काळात समाजासाठी म्हटलं तर कोणतं लक्षणीय काम केलेलं दिसून आलं नाही. त्यात तिने काँग्रेसमधून पक्षीय राजकारणामुळे समाजासाठी काही करता आलं नाही असं सांगत राजीनामा दिल्यामुळं आता ती शिवसेनेत आल्यावर समाजात नक्की काय अमूलाग्र बदल करणार हे पाहावंच लागेल. तसंच उर्मिला हीच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात किती आणि कसा फरक पडणार आहे. तसंच सामान्य जनतेसाठी या प्रवेशाचा काय फायदा ? या सर्व प्रश्नांसह एक गोष्ट मात्र पुन्हा समोर आली आहे की, रुपेरी पडद्याची चंदेरी दुनिया उपभोगलेल्या कित्येकांना राजकारणाची दुनिया अनुभवायचीच असते. फरक इतकाच की आधीच्या काळातील बरेच सेलिब्रिटी यांना समाजाची जान होती आणि ते आपल्या कामांनी जनतेचे चहिते झाले आहेत. मात्र अलीकडे अनेक सेलिब्रिटी ज्यांचा सामाजिक कार्याशी दुरान्वय ही संबध नसतो तेही सत्तेसाठी पक्ष बदलत फिरत आहेत. अशात त्यांचा किंवा पक्षांचा कोणताही तोटा होणार नसून त्यांना लाख मोलाचं मत देणाऱ्या सामान्यांचाच तोटा होणार आहे.