Fri. Apr 23rd, 2021

अभिनेत्री गौरी किरणला राज्य सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट पदार्पणा’चा पुरस्कार!

राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘कै. रंजना देशमुख उत्कृष्ट प्रथम पदार्पण- अभिनेत्री’ या पुरस्काराने अभिनेत्री गौरी किरण हिला गौरवण्यात आलं आहे. 2018 मध्ये ‘पुष्पक विमान’ या चित्रपटातून गौरी हिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

गौरीची ‘पुष्पक’ भरारी!

सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘पुष्पक विमान’ चित्रपटातून गौरी किरण (गौरी कोठावदे) हिने यशस्वी पदार्पण केलं.

सुबोध भावे, मोहन जोशी यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत तिने भूमिका साकारली.

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या गौरीचं बालपण, शिक्षण कोकणातील दापोलीमध्ये गेले आहे. अभिनयात करिअर करण्याच्या विचाराने मुंबईत आलेल्या गौरीला सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला. मूळची पत्रकार असलेली गौरी हिने काही काळ ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीमध्ये बातमीदार म्हणून काम केलंय. सध्या मनोरंजन क्षेत्रात ती उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तिने आत्तापर्यंत अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलंय. तसंच नाटक, शॉर्ट फिल्म्स, टीव्ही मालिका आणि वेबसीरिजमध्येही तिने अभिनय केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्पेशल 5’ या क्राईम शोमधील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

‘जय महाराष्ट्र’ची पत्रकार ते यशस्वी अभिनेत्री : गौरी किरणचा प्रवास

“गेल्या वर्षभरात पुष्पक विमानामुळे प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात स्मिता या कोकणी मुलीचे कॅरेक्टर रंगवले होते. तेव्हापासून मला ‘फणस’ असं टोपणनाव पडलंय. हे सगळं कौतुक या पुरस्काराच्या निमित्ताने सार्थकी लागलंय, असं मला वाटतंय. माझ्या पहिल्याच चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद तर होतोयच पण त्याबरोबर येणाऱ्या काळात देखील चांगलं काम करण्याची जबाबदारी आली आहे. हा पुरस्कार मी माझे कुटुंबीय, सहकारी, प्रेषक आणि माध्यम क्षेत्रातील माझ्या सर्व मित्रांना समर्पित करत आहे.” अशी प्रतिक्रिया गौरी किरण हिने पुरस्कार मिळाल्यावर दिली आहे.

राज्य सरकारचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार प्राप्त केलेल्या अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत.

मुक्ता बर्वे (चकवा – २००४),

वीणा जामकर (बेभान – २००५),

सोनाली कुलकर्णी (बकुळा नामदेव घोटाळे – २००८),

राधिका आपटे (घो मला असला हवा – २००९),

नेहा पेंडसे (अग्निदिव्य – २०१०)

मृण्मयी देशपांडे (लेक माझी गुणाची – २०११)

या गाजलेल्या अभिनेत्रींच्या यादीत आता गौरी किरणच्या नावाचीही भर पडलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *