Mon. Jan 18th, 2021

‘मन फकीरा’तून अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचं दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ (Man Fakira) हा सिनेमा व्हॅलेन्टाईन्स डे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.  या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलंय.

या चित्रपटात सुव्रत जोशी (Suvrat Joshi), सायली संजीव (Sayali Sanjeev), अंजली पाटील (Anjali Patil) आणि अंकित मोहन (Ankit Mohan) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 “मला नेहमीच दिग्दर्शिका व्हायचं होतं. गेली दहा वर्षे माझ्या मनात ही गोष्ट घोळत होती. दिग्दर्शन (Direction) काही माझ्यासाठी नवीन नाही. कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला असताना मी एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं बक्षीसही मिळालं होतं. दिग्दर्शनासाठी एक ठरावीक प्रगल्भता लागते. तुम्ही तुमच्या जीवनप्रवासात शिकत जाता. एकेक प्रसंग हाताळताना त्यातून ही प्रगल्भता येते आणि त्यातून तुम्ही दिग्दर्शनासाठी सज्ज होता. मला त्याबाबत आत्मविश्वास आला आणि दिग्दर्शनाचं हे पाऊल टाकलं.” असं मृण्मयीने आपल्या दिग्दर्शनाच्या निर्णयाबद्दल म्हटलं आहे.

काय आहे सिनेमाचा विषय?

नातेसंबंध हा विषय आणि त्यातील गुंता हा या सिनेमाचा प्रमुख विषय आहे.

मानवी नातेसंबंध हे खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याचा विषय आहे.

हे नातेसंबंध नीट आणि सहजपणे मांडता आले तर अधिक रंजक बनतात.

हे नातेसंबंध व्यक्त करण्याची संधी या कथेत दिसल्यामुळे आपण या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असल्याचं मृण्मयीने म्हटलंय.

आजची युवा पिढी विशेषतः लग्न या नात्याकडे फक्त बंधन म्हणून न बघता त्याच्यापलीकडे जगायला शिकली आहे.

केवळ बंधन न वाटता या माणसाबरोबर आयुष्य काढता येणं शक्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा सोडवून मग या गणितामध्ये उतरण्याचा विचार ही युवा पिढी करते.

खऱ्या अर्थाने जोडीदार या शब्दाची व्याख्या किंवा समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न ते या लग्नामध्ये शोधत असतात मग ते योग्य तो निर्णय घेऊन ही सीमा ओलांडतात.

त्यामुळे बदलत्या मराठी प्रेक्षकवर्गाला आणि त्यातही युवा पिढीला तो खूप भावेल, अशी आशा मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केली आहे.

या सिनेमाचं लेखनही मृण्मयीनेच केलं आहे.

पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *