लॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ

कोरोनाचा धोका वाढल्यामुळे देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन २१ दिवस असणार असल्यामुळे लोक अन्नधान्याची साठवणूक करू लागले आहेत. मात्र यासोबतच आणखी एका वस्तूची साठवणूक करायला अनेकांनी सुरूवात केली आहे. ही गोष्ट म्हणजे कंडोम… होय, आवश्यक वस्तूंसोबत कंडोमची साठवणूकही लोक मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर ताबडतोब लोक घराबाहेर पडले व गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी दुकानाबाहेर रांग लावू लागले. भाजीपाल्यापासून ते मॅगीपर्यंत अनेक गोष्टी विकत घ्यायला लोकांची झुंबड उडाली. मात्र या वस्तूंबरोबरच २१ दिवस घरांमध्ये राहण्याची तयारी करणाऱ्या अनेकांनी कंडोमही भरपूर प्रमाणात विकत घेतल्याचं समोर आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून साबण, हँड सॅनिटायजर्स याचबरोबर मेडिकल स्टोअर्समध्ये कंडोमची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं समोर आलं आहे. कंपन्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Work From Home करण्यास सांगितलं आहे. पुढील २१ दिवस नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे. अशावेळी विविध वस्तू घरात साठवून ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. यात कंडोमची पाकिटं घेण्याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. लोक औषधं आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीसोबत कंडोमची पाकिटं खरेदी करत आहे. १० ते २० कंडोम्स असणारी पाकिटं लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. कंडोमची खरेदी थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आहे.
कंडोमच्या पाकिटांच्या खरेदीप्रमाणेच गर्भनिरोधक गोळ्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मॉल्स बंद झाल्यापासून केमिस्टच्या दुकानांत लोक कंडोमखरेदीसाठी गर्दी करत आहेत.