Mon. Mar 8th, 2021

‘रामायण’, ‘महाभारत’ नंतर लोकाग्रहास्तवर आता ‘शक्तीमान’ आणि ‘चाणक्य’ही पुन्हा दूरदर्शनवर

कोरोना व्हायरसचा संसर्ग फैलावू नये, यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवर रामायण, महाभारत या एकेकाळच्या सुप्रसिद्ध मालिका दाखवण्यास सुरुवात केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळू लागला. त्याही पुढे जात प्रेक्षकांनी ‘शक्तीमान’ सुरू करण्याची मागणी केली. अखेर या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यानुसार आता शक्तीमान मालिकाही दूरदर्शनवर पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तब्बल १५ वर्षांनी ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २००५ सालापर्यंत ही मालिका सुरू होती.  

अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘महाभारत’ मालिकेत पितामह भीष्मांची अविस्मरणीय भूमिका साकारल्यानंतर ‘शक्तीमान’ या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आत्तापर्यंत विदेशी सुपरहिरो पाहयची सवय असणाऱ्या मुलांना ‘शक्तीमान’च्या रूपाने पहिला देशी सुपरहिरो मिळाला. त्यावेळी ‘शक्तीमान’ आठवड्यांतून एकदाच प्रसारित होत असे. तरीही ही मालिका तब्बल १२ वर्षं सुरू होती. मात्र काही कारणास्तव ही मालिका वादात अडकली. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या हेतूने सुरू केलेली ही मालिका मुलांवर वाईट संस्कार करत असल्याचा आरोप होऊ लागला. शक्तीमान आपल्याला वाचवायला येईल अशी वेडी आशा बाळगून मुलं भलतीसलती धाडसं करू लागली, असा आरोपही मालिकेवर होऊ लागला. केबल टीव्हीच्या जमान्यात दूरदर्शनच्या मालिकेला मिळणाऱ्या जबरदस्त टीआरपीमुळेच काही लोकांनी कट-कारस्थान करून या मालिकेवर खोटे आरोप केले आणि मालिका बंद करण्यास भाग पाडलं, असं मुकेश खन्ना यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. शक्तीमान मालिकेला मिळणारा TRP  १२ वर्षांत एकदाही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला होता. मात्र तरीही ही मालिका तेव्हा बंद करण्यात आली होती. आता १५ वर्षांनी लॉकडाऊनच्या निमित्ताने खास लोकाग्रहास्तव ही मालिका १ एप्रिलमपासून पुन्हा दाखवायला सुरुवात केली.

इतकी वर्षं उलटूनही या मालिकेतील शक्तीमान, गीता, किल्विष यांसारखी पात्रं लोक आजही पसंत करतात. ‘गंगाधर ही शक्तीमान है’, ‘अंधेरा कायम रहे‘, ‘सॉरी शक्तीमान’ यांसारखे संवाद आजही लोकांच्या तोंडी आहेत. त्यामुळेच ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरूवात केल्यावर त्यालाही पुन्हा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि लोक लॉकडाऊनच्या काळात शक्तीमान पाहतील अशी आशा आहे.  

‘शक्तीमान’प्रमाणेच ‘चाणक्य’ ही मालिकादेखील लोकप्रिय होती. या मालिकेचंही पुनर्प्रक्षेपण सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *