कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याने संजय राऊत म्हणाले…

क्रूझवरील अंमली पदार्थप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत आहे. याप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा तसेच या प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल असल्याचा दावा किरण गोसावीचे खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणाबाबत ट्विट केले आहे.
संजय राऊत यांनी ट्विट केले की, ‘आर्यन खान ड्रग्जप्रकरणात एनसीबीने साक्षीदारांना कोऱ्या कागदांवर सह्या करायला लावल्या हे धक्कादायक आहे. तसेच या प्रकरणात मोठ्या रकमेची मागणीदेखील करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. हे महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा संशय आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे.’ संजय राऊत यांनी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही ट्वीटमध्ये टॅग केले आहे. पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.
क्रूझवर झालेल्या छापेमारीच्या रात्री तेथे एनसीबी अधिकाऱ्यांसोबत के.पी. गोसावीदेखील होते. त्या छापेमारीनंतर एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या. असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे. यावेळी पैशांचा व्यवहारही झाल्याचे बॉडीगार्डने म्हटले आहे.