Thu. Mar 4th, 2021

‘रामायण’ मालिकेत विविध भूमिकांत दिसणारे ‘ते’ कलाकार ३३ वर्षांनी प्रसिद्धीच्या झोतात

कोरोनामुळे देशभरात असलेल्या लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनने रामायण ३३ वर्षांपूर्वी अफाट लोकप्रियता मिळवलेली मालिका पुनर्प्रक्षेपित करायला सुरूवात केली आणि त्याला पुन्हा उदंड प्रतिसाद मिळू लागलाय.या मालिकेमुळे दूरदर्शन देशातली नंबर एकची वाहिनी बनली आहे. रामायण मालिका पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सोशल मीडियावरदेखील ‘रामायण’ मालिकेतील पात्रांवर memes, Tik Tok व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. विशेष म्हणजे प्रमुख पात्रांबरोबरच या मालिकेतील एका कलाकारावर नेटिझन्स जास्त लक्ष देऊन आहेत. हा कलाकार रामायणात विविध भूमिका साकारताना दिसतो. कधी वानरांच्या फौजेत, कधी राक्षसांच्या सैन्यात, कधी ऋषीमुनांच्या भूमिकेत तर कधी समुद्रदेवतेच्या रूपात हा एकच कलाकार काम करताना दिसतो. इतरवेळी नगण्य भूमिका करणारा हा कलाकार मीम्समुळे चर्चेत आला आहे. हा कलाकार नेमका कोण याचा आता लोक शोध घेत आहेत.

तर या कलाकाराचं नाव अस्लम खान असं आहे. रामायण मालिकेप्रमाणेच रामानंद सागर यांच्या ‘अलिफ लैला’  मालिकेतही त्यांनी अशाच विविध भूमिका साकारल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या काळात काम न मिळाल्यामुळे ते आपल्या गावी झाँशीला परतले होते.

असलम खान हे उत्तर प्रदेशातच अकाउंटंटची नोकरी करत होते. मात्र अभिनयाची इच्छा त्यांना मुंबईला घेऊन आली. दूरदर्शन त्यावेळी लोकप्रिय होऊ लागलं होतं. मुंबईत रामानंद सागर यांच्या प्रोडक्शन संस्थेत काम मिळालं. ‘विक्रम वेताळ’ या मालिकेतही त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यानंतर ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘कृष्णा’ या मालिकांत त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. मात्र तरीही त्यांना म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. २००२ नंतर त्यांना कामही मिळेनासं झालं. तेव्हा ते झाँशीला परतले.

मात्र सोशल मीडियामुळे ३३ वर्षांपूर्वीच्या कामामुळे त्यांना अचानक ओळख मिळाली. यामुळे आपल्याला खूप आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मुलानेदेखील सोशल मिडियावर वडिलांना मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र इतक्या वर्षांत ओळख मिळवून देणारं काम मात्र त्यांना मिळालेलं नाही, याचं आपल्याला दुःख असल्याचं त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *