‘माझ्याऐवजी एखाद्या तरुण कोरोनाग्रस्तासाठी व्हेंटिलेटर वापरा’, ‘त्या’ महिलेचं बलिदान

कोरोना आज जगभरात हजारे लोकांचे प्राण घेत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या इतकी वाढत आहे, की या सर्वांसाठी पुरेसे वैद्यकीय उपचारदेखील शक्य होत नाहीयेत. काही ठकाणी आयसोलेशन वॉर्डची कमतरता आहे, तर काही ठिकाणी मेडिकल किट्सची. अशा परिस्थितीत बेल्जियम येथील एका आजीबाईंनी केलेल्या बलिदानाची घटना ही निश्चितच डोळे पाणावणारी आहे.
बेल्जियमच्या या वृद्ध महिलेचं नाव सुझान हॉटलर्ट्स असं आहे. कोरोनामुळे वयाच्या नव्वदाव्या वर्षी या महिलेचा मृत्यू झाला आहे. २० मार्च रोजी या महिलेला कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला वाचवण्यासाठी डॉक्टर शक्य ते सारे प्रयत्न करत होते. ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची जाणीव होताच सुझान आजींनी अशाही परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी व्हेंटिलेटर लावायला नकार दिला. आपल्याऐवजी एखाद्या तरूण रुग्णासाठी या व्हेंटिलेटरचा वापर करावा आणि त्याचे प्राण वाचवावे, असं या सुझान आजींनी निर्धारपूर्वक म्हटलं.
सुझान यांचा हा निर्णय ऐकून डॉक्टर आणि नर्सेसदेखील आपले अश्रू रोखू शकले नाहीत. मृत्यू समोर दिसत असतानाही आपले प्राण वाचवण्याऐवजी दुसऱ्याचे प्राण वाचावा यासाठी त्यांनी व्हेंटिलेटर नाकारलं. ‘मी माझं आयुष्य जगले आहे. माझे प्राण वाचवण्याऐवजी एखाद्या तरुण रुग्णाचे प्राण वाचवा. त्याच्यासाठी हे व्हेंटिलेटर वापरा’ असं या महिलेने म्हटलं. यानंतर काही तासांतच सुझान यांचं निधन झालं. मात्र मृत्यूसमयीदेखील मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या सुझान या निश्चितच एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत.