अकोल्यातील ‘या’ गावात 300 वर्षांपासून होते रावणाची पूजा!

दसऱ्याच्या सणाला रावण दहनाची प्रथा वर्षानुवर्षं पाळली जाते. मात्र अकोला जिल्ह्यातील सांगोळा हे त्याला अपवाद आहे. येथे रावणाच्या सद्गुणांमुळे येथे त्याची पूजा केली जाते. तब्बल 300 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.
कुठे होते रावणाची पूजा?
बाळापूर तालुक्यातील वाडेगावनजीक हे गाव आहे.
गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची मूर्ती आहे.
ही मूर्ती या गावाचं वैशिष्ट्यही आहे तसंच श्रद्धास्थानही आहे.
रावण कपटी, अहंकारी होता. अमर्याद भोगलालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती.
मात्र रावणातील हे दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचं दर्शन होतं.
तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यास इत्यादी गुणांचा विचार करून सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते.
हे रावणाचे मंदिर जिल्हातले नव्हे तर राज्यातले एकमेव मंदिर असल्याचं सांगण्यात येतं.
काय आहे या मंदिरामागची आख्यायिका ?
महापंडित रावणाची लंका नगरी अकोल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे.
पण अकोला जिल्हातल्या सांगोड़ा या गावात महापंडित दशानन रावणाची नित्यनियमान पूजा केली जाते.
गेल्या 300 वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती.
त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात.
ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपवण्यात आलं.
पण, त्याच्या हातून घडली ती दशाननरावणाची. दहा तोंडं, काचा बसवलेले 20 डोळे, सर्व आयुधं असलेले 20 हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली.
दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती असा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांना जाणवला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले.
वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते.