… अखेर अण्णांनी मौन सोडले
निर्भयाला न्याय मिळाल्यानंतर अण्णांचे मौनआंदोलन मागे

दिल्लीत 7 वर्षापूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणातील दोषींना आज दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. आणि तब्बल सात वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला.
या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि निर्भयाला न्याय मिळावा यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सातत्याने सरकारकडे मागणी आणि पाठपुरावा करत होते. मात्र निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा निर्णय होत नव्हता. म्हणून अण्णा हजारे यांनी एक वेगळ्या पध्दतीचे आंदोलन सुरू केले होते.
अण्णांनी राळेगणसिद्धीत त्यांच्या राहत्या ठीकाणी मौन आंदोलन सुरू केले होते. सरकारने महिला सुरक्षेवर लक्ष द्यावे आणि निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी अण्णांनी 20 डिसेंबरपासून हे आंदोलन सुरू केले होते. आज निर्भयाच्या दोषींना फाशी झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी अण्णांनी हे मौन सोडलं.
सकाळी 10 वाजता अंण्णा यादवबाबा मंदिरात आले. त्यांच्यासमेवत निवडक ग्रामस्थ होते. ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय,’असा जयघोष करत अण्णांनी मौन सोडले. मौन सोडल्यानंतर अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी यापुढे सरकारने अशा प्रकरणातील शिक्षेच्या अंमलबजावणीत विलंब होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे आणि महिला सुरक्षेला गांभीर्याने घ्यावे अशी मागणीही केली.