यशोमती ठाकूर यांचं विधान अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं – अंनिस

अमरावतीच्या पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील सारशी येथे पार्वती गोमाता उत्सवादरम्यान केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते, असे वक्तव्य ठाकूर यांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे.
यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यक्त केलंय.
गाय एक उपयुक्त पशू आहे. जर कुणी म्हणत असेल की गाईच्या अंगावरून हात फिरविल्याने मन शांती मिळते किंवा शरीरातील नकारात्मकता नष्ट होते, तर ते आजच्या वैज्ञानिक काळात संयुक्तिक वाटणार नाही असंही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव हरिश केदार यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातमी- गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते – यशोमती ठाकूर
भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी मात्र ठाकूर यांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय. यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींसह काँग्रेसमधील सर्व नेत्यांना गाईचं महत्त्व समजावून सांगावं, असंही शिवराय कुलकर्णी यांनी म्हटलंय.