राज्यपालांचा झट की पट निर्णय; एमपीएससीवर तीन सदस्यांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यावर अवघ्या चार दिवसांत तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना आज जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत बुधवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्य नियुक्तीमुळे या भरतीप्रक्रियेला वेग येणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
आयोगाच्या एक सदस्यांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होत असून त्यांची रिक्त होणारी जागा भरण्यासाठीही लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे राज्यपालांना सांगितले. हे दोन्ही प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यपाल म्हणाल्याचे भरणे यांनी सांगितले.
राज्य लोकसेवा आयोगाचे नवे सदस्य:
- डॉ. देवानंद शिंदे, केमिकल टेक्नोलॉजी प्रोफेसर
- डॉ. प्रताप दिघावकर, निवृत्त आयपीएस अधिकारी
- राजीव जाधव, निवृत्त सनदी अधिकारी