Sat. Nov 27th, 2021

गिरीश बापट यांच्यावर मंत्रीपदाचा गैरवापर केल्याबद्दल कोर्टाचे ताशेरे!

पुरवठा आयुक्त आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने रद्द केल्यानंतरही रेशन दुकानदाराला पुन्हा परवाना बहाल केल्यानं राज्याचे पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर औरंगाबाद खंडपीठाने जोरदार ताशेरे ओढलेत.

स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी विक्रेत्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीवेळी, मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र, त्यांनी कर्तव्यपालनात कसूर केल्याचे या प्रकरणात स्पष्टपणे दिसून येत आहे. मंत्री पदाचा गैरवापर करून कायद्याची पायमल्ली केल्याचा ठपकाही औरंगाबाद खंडपीठाने पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर ठेवला आहे.

काय होतं नेमकं प्रकरण?
बीड जिल्ह्यातील साहेबराव वाघमारे यांनी बिभीषण माने या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. स्वस्त धान्य दुकानदार माने हे शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता काळ्याबाजारात विक्री करतात असं तक्रारीत म्हटलं होतं. त्याची चौकशी केल्यानंतर तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द केला होता.

या विरोधात दुकानदाराने उपायुक्त आणि बीड जिल्हा पुरवठा अधिकारी अपील दाखल केले. त्यांच्याही चौकशीत दुकानदार दोषी आढळल्यानंतर दुकानाचा परवाना रद्द केला. मग दुकानदाराने राज्याचे नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे अपील केले. त्यावर मंत्र्यांनी अपील मंजूर करीत दुकान तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.

याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर खंडपीठाने सरकारच्या कृतीवर बोट ठेवले. शिवाय जो परवाना पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिला होता, तोही खंडपीठाने रद्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *