Jaimaharashtra news

संंतांच्या गावातच हरीपाठाचे पाठांतर नसल्याने चिमुरड्याला अमानुष मारहाण

राज्यात शुल्लक कारणांवरून चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. या घटनेतील आरोपीवर अनेक वेळा कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच यातील आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. दरम्यान अशीच एक आळंदीतील शुल्लक कारणावरून चिमुकल्याला झालेल्या मारहाणीची घटना उघडकीस आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

आळंदीमध्ये माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. या आश्रम शाळेमध्ये मागील वर्षभरापासून शिक्षण घेणाऱ्या ओम चौधरी या अकरा वर्षीय चिमुरड्याला केवळ हरिपाठाचे पाठांतर केले नसल्याने आश्रम शाळेत बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आश्रम शाळेतील महाराज भगवान पोव्हाणे यांनी मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती खालावली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी आश्रम शाळेत भगवान पोव्हाणे यांनी हरी पाठाचे पाठांतर केले नसल्याने मुलाला मारहाण केली. त्यानंतर पालकांना मुलगा आजारी असल्याचे खोटे सांगून पालकांची दिशाभूल करून जखमी मुलाला घरी घेऊन जाण्यास भाग पाडले.

मात्र या मारहाणीत ओम चौधरी याची शुद्ध हरपली. अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलाला सोबत घेत तळेगाव दाभाडे येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु या आनंद हॉस्पिटलमध्ये या मुलाची तब्येत अजून खालावली. तब्बल चार दिवस पीडित मुलगा शुद्धीवर नसल्याने नेमका काय प्रकार घडला, याबाबत कोणालाही काहीच माहीत नव्हते.

परंतु मुलगा शुद्धीवर येताच त्याने आश्रम शाळेमध्ये घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत भगवान महाराज पोव्हाने याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती पोलीसांना केली. परंतु आळंदी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे पालकांनी सांगितले.

सध्या पिंपरी येथील डी वाय पाटील रुग्णालयात मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर यामिनी आडबे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत पुढाकार घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना या संपूर्ण गंभीर घटनेची माहिती देताच पोलिसांनी तक्रार दाखल केली.

अद्याप या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आश्रम शाळेतील महाराजाला ताब्यात घेतले नाही. मात्र कलम 307 प्रमाणे आरोपी महाराज वर गुन्हा दाखल झाला असून आरोपी महाराज सध्या फरार आहे.

आळंदी पोलीस महाराजांच्या मागावर आहेत. मात्र आधीच जखमी मुलांच्या पालकांची तक्रार घेऊन मारकूटा आरोपी महाराज याला ताब्यात घेतले असते तर पोलिसांना आरोपी शोधायची वेळ आली नसती. अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version