Wed. Jan 19th, 2022

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला…

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा कोरोनासंबंधित नियमांचे पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. गर्दी होऊ नये यासोबतच कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी चैत्यभूमी आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक नेतेमंडळींनी महामानवाला अभिवादन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे. आमचे सरकार हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी काम करत असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते आज चैत्यभूमीवर येऊ शकले नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यातल्या सिम्बॉयसिस महाविद्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातल्या सिम्बॉयसिसमध्ये दाखल झालेल्या या दोन्ही भाजपच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयालाही भेट दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचे स्मरण केले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा महामंत्र वंचित-उपेक्षित लोकसमूहाला देऊन डॉ. बाबासाहेब यांनी कोट्यवधी दलित बांधवाना जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची अभूतपूर्व कामगिरी बजावली. त्यासाठी महाप्रचंड वाचन-संशोधन करून भारतीय इतिहासाची पुनर्रचना करणारे ग्रंथ लिहिले. नव्या भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान इतके महत्वपूर्ण आहे की, आपल्या देशाचा यापुढचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *