‘एच-१बी’ व्हिसावरील निर्बंध उठवल्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा

अमेरिकेतील बायडन प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून या भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेतील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीसाठी उपयुक्त असणाऱ्या एच१बी व्हिसावर घातलेले निर्बंध संपुष्टात आले आहेत.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात निर्बंध घातले होते. हे निर्बंध ३१ मार्च रोजी संपुष्टात आले. त्यानंतर बायडन प्रशासनाने नवीन निर्बंधांबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत.त्यामुळे आयटी कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
अमेरिकन सरकार दर वर्षी ८५ हजार ‘एच-१बी’ देते. त्यापैकी ६५ हजार व्हिसा विदेशातील तंत्रकुशल कर्मचाऱ्यांना दिला जातो. याशिवाय अन्य २० हजार व्हिसा विदेशी कर्मचाऱ्यांसह उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिले जातात. ‘एच-१बी’ व्हिसाचा सर्वाधिक लाभ भारतीय आयटी कंपन्यांना होतो.अमेरिकेत राहणारे भारतीय या व्हिसावर अमेरिकेत वास्तव्य करतात. तीन वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. मात्र, अमेरिकेतील वास्तव्य वाढविण्यासाठी संबंधित कर्मचारी सातत्याने कंपनी बदलत राहतो. त्यामुळे त्याच्या व्हिसाची मुदतही वाढत जाते.
‘एच-१बी’ व्हिसावरील निर्बंध उठवल्यामुळे आता भारतातील तसेच इतर देशांतील कर्मचारी अमेरिकेत नोकरीसाठी जाऊ शकणार आहेत. आयटी कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांनाही आता ‘एच-१बी’ व्हिसा मिळू शकणार आहे.