नाना फसले, भाजपावाले भिडले

भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा आक्रमक झाला आहे. नाना पटोले यांचे सोमवारी ‘मोदीला मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे वक्तव्य समोर आले. त्यानंतर, भाजपाने राज्यभरात पटोले यांच्याविरोधात आंदोलने केली. पटोले यांच्याविरोधात पोलिसात ठिकठिकाणी भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र, पटोले यांच्यावर कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच पक्षाने अनेक ठिकाणी आंदोलने केली. या आंदोलनाच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था मोडल्याच्या आरोपावरून भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि अतुल भातखळकर यांना त्यांच्या आंदोलनस्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
भंडारा, गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला आणि नाना पटोले यांना पराभव दिसत असल्यामुळे मतदारांकडून सहानुभूती मिळविण्यासाठी नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर टीका टीप्पणी केली. तर गेल्या २७ वर्षापासून त्यांचा असाच राजकीय अजेंडा राहिला असल्याची टीका भाजपचे आमदार आणि भंडाऱ्याचे माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी केली आहे.
नाना पटोले यांच्या पंतप्रधान मोदींवरच्या अपमानकारक वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील कुही पोलीसठाण्यात नाना पटोलेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.