सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक

मुंबई: मुंबईतील चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कोरोना लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या सर्वांना प्रवास करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी आणि राज्य सरकारच्या वेळकाढू भूमिकेविरोधात आज भाजपातर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपकडून मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. चर्चगेट, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, ठाण्यात भाजपच्या नेत्यांनी लोकल प्रवासाच्या प्रवेशासाठी आंदोलन केलं. अनेक ठिकाणी आंदोलनापासून भाजप कार्यकर्त्यांना अडवण्यातदेखील आलं.
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चगेट स्टेशनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते लोकलमध्ये शिरले आणि त्यांनी लोकलने प्रवास करायला सुरुवात केली. काही वेळातच त्यांनी लोकल प्रवास करण्यापासून अडवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दरेकर लोकलमध्ये चढले. चर्चगेट ते चर्नीरोड असा प्रवास त्यांनी केला.पोलिसांच्या कडक बंदोबस्तातही दरेकरांनी लोकलमध्ये प्रवेश केला. या आंदोलना दरम्यान राहुल नार्वेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.विना तिकीट आणि सामान्यांना प्रवासाची मुभा नसताना भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास केल्याने रेल्वे प्रशासनाकडून दंड आकरण्यात आला.
कांदिवलीमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.