Wed. Aug 10th, 2022

‘संजय राऊत, तुमच्या मालकाची मुलं काय करतात ते पाहा’; राणे यांचा प्रहार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही राणे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले.

‘शिवसेनेत नारायण राणेंविरोधात बोलल्यावर उत्तम पदे मिळतात,’ अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच आता वाकयुद्ध रंगलं आहे. राणेंच्या खात्यावर टीका करताना, ‘सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?’, असं अजित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना नारायण राणे यांनी अजित पवार अजून अज्ञानी आहे अशी बोचरी टीका केली आहे.

‘माझ्या जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेल्यासारखे मध्येमध्ये काही अपशकुन झाले. त्यानंतर आता अग्रलेख येत आहेत. कोणाच्या मुलांवर बोलण्यापेक्षा आपली मुले किती पराक्रमी आहेत, हे त्यांनी पहावं. संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करीत आहेत ते आधी पाहा’, असंदेखील राणे म्हणाले आहेत.

तसेच, ‘जेव्हा बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला,माझ्या लोकांना बोलावले होते. त्यावेळी मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत होतो. या दिवसांमध्ये मी झोपलो देखील नव्हतो. त्यांनी मुलाला सोबत घेतलं नव्हतं’, असंही राणे यावेळी म्हणाले.

‘वैयक्तिक टीका करणं थांबवा, अन्यथा प्रहामधून लिहायला सुरुवात करेन. मी गप्प बसणार नाही’, असा निर्वाणीचा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.