राज्यात २५ हजार, तर मुंबईत केवळ साडेतीन हजार रक्तपिशव्या शिल्लक

राज्यातील कोरोनारुग्ण वेगाने वाढत असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ २५ हजार रक्ताच्या पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे, तर मुंबईत केवळ साडेतीन हजार रक्ताच्या पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक आहेत.
रक्ताचा साठा कमी झाल्याने कोरोना रुग्णांना रक्तद्रव तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी रक्त मिळणे कठीण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेऊन ‘राज्य रक्तसंक्रमण परिषदे’ला विशेष आर्थिक मदत आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तसेच रक्तदान कार्यक्रमासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारच्या या उपेक्षेमुळे ऐच्छिक रक्तदान येत्या काळात मोठ्या प्रमाणात घटेल, असे रक्तदान क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.