Thu. Nov 26th, 2020

कंत्राटदारांसमोर मुंबई पालिकेने टेकले गुडघे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कंत्राटदारांच्या जी हुजूरीमुळे मुंबई महापालिका पुन्हा एकदा मोठ्या घोटाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नालेसफाईत गाळ वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महापालिकेने बंधनकारक केलेली व्हीटीएस अर्थात व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिमच निकाली काढण्याचा घाट बीएमसीने घातला आहे.

 

पश्चिम उपनगरातील नालेसफाईकरता कोणताही कंत्राटदार पुढे येत नाही. बीएमसीने थेट नियमांना हरताळ फासत कंत्राटदारांच्या मागणीनुसार व्हीटीएस अटच शिथिल करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

 

त्यामुळे कंत्राटदाराने नालेसफाईदरम्यान किती गाळ काढला आणि किती गाळ वाहून नेला याचा हिशोबच पालिकेला मिळणार नसल्याने पालिकेकडून अव्वाच्या सव्वा वसुलीकरता कंत्राटदारांना रान मोकळे झाले आहे.

 

दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नालेसफाई घोटाळ्यात कंत्राटदारांनी चक्क रिक्षा, मोटारसायकल, टेम्पोचे नंबर देऊन या वाहनांतून गाळ वाहून नेल्याचे दाखवल्याचे उघड झाले होते.

 

त्यामुळे पालिकेने गाळ वाहून नेण्याच्या कामासाठी व्हीटीएस प्रणाली सक्तीची केली होती. आताशा कुठे रस्ते कंत्राटाच्या घोटाळ्यातून बाहेर पडलेली बीएमसी पुन्हा एकदा नालेसफाईच्या गाळात रुतणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *