ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आल्यानंतर काही काळातच आता ब्रिटिनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आपल्याला कोरोनाची काही लक्षणं दिसत असून स्वतःला विलगीकरणात ठेवत असल्याचं स्वतः जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नींनंतर ब्रिटनमध्येही राष्ट्रीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या आजाराचं गांभीर्य वाढलं आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी Tweet करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. “गेल्या २४ तासांपासून मला काही लक्षणं जाणवत होती. याची तपासणी केली असताना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे मी सध्या विलगीकरणात आहे. मी सध्या कोरोनाशी लढा देत आहे. व्हिडिओ कोन्फरन्सिंगच्या माध्यमातून मी सरकार चालवत राहणार आहे” असं आपल्या ट्विटमधून त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय बनला आहे. ब्रिटनच्या शाही घराण्यातही प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. कॅनडाच्या राष्ट्रप्रमुखांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचं गांभीर्य वाढलं आहे. आत्तापर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली वाढ ही जगभरात चिंतेचा विषय बनली आहे.