बजेटनंतर पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासादायक बाब म्हणजे पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटीत 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिलीय.
सध्या गगनाला भिडणा-या इंधनाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज डयुटी कमी केली आहे.
ब्राण्डेड आणि अनब्राण्डेड पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज डयुटीत कपात केली आहे. अनब्राण्डेड पेट्रोलवर प्रतिलिटर 6.48 रुपये अबकारी कर आकारला जात होता. तो आता 4.48 रुपये केला आहे. ब्राण्डेड पेट्रोलवर प्रतिलिटर 7.66 रुपये अबकारी कर आकारला जातो. तो आता 5.66 रुपये झाला आहे.
अनब्राण्डेड डिझेलवर प्रतिलिटर 8.33 रुपये अबकारी कर आकारला जातो तो आता 6.33 रुपये झाला आहे. प्रतिलिटर ब्राण्डेड डिझेलवर 10.69 रुपये अबकारी कर आकाराला जात होता तो आता 8.69 रुपये झाला आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, पुणे, चेन्नई आणि नोएडामध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर सरासरी 80 रुपये आहे. मुंबईत प्रतिलिटर डिझेलचा दर 68.17 रुपये आहे. मागच्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.