धक्कादायक! तिसरीतल्या विद्यार्थिनीला अर्धनग्न करून दिली अमानुष शिक्षा

तिसरीत शिकणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार मिरा रोडच्या शांतीनगर मध्ये घडला आहे.
शांतीनगर येथील पीडित मुलीस लता नामक खासगी शिक्षिकेकडे पाठवत होते.
गेल्या महिन्यात पीडित मुलीने गृहपाठ केला नाही, म्हणून तिच्या गुप्तांगावर आणि मांडीवर छडीने मारलं.
त्यामुळे तिच्या मांडीवर काळे, निळे व्रण उठले.
हे लक्षात आल्यावर मुलीच्या आईने त्यांना अशी शिक्षा न करण्यास सांगितलं होतं.
मात्र, 17 जानेवारी रोजी मुलगी शिकवणीवरुन घरी परतली असता, तिने पाय दुखत असल्याचं आईला सांगितलं. तिला चालताना त्रास होत होता.
चौकशी केली असता, लताने तिला अभ्यास केला नाही म्हणून तिचे कपडे काढून 450 उठाबशांची शिक्षा केल्याचं समजलं. या शिक्षेमुळे तिच्या मांड्या आणि पायाच्या पोटऱ्या सुजून चालण्यास त्रास होत होता.
याप्रकरणी संबंधित खाजगी शिकवणीच्या शिक्षिकेविरुध्द मिरारोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पीडित मुलीचे पालक आणि आरोपी शिक्षिका मात्र यावर काही बोलायला तयार नाही.