दूरदर्शनवर ‘ही’ लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा मिळणार पाहायला

कोरोनाच्या संसर्ग टाळता यावा यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आता या काळात सर्वांना घरी बसावं लागत आहे. तेव्हा घरी बसून काय करणार असा प्रश्न असणाऱ्या लोकांसाठी सरकारच्या दूरदर्शन वाहिनीवर जुन्या लोकप्रिय मालिका सुरू केल्या. ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दूरदर्शनवर सुरू केल्यावर लोकांचा त्यांना तितकाच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय खास लोकग्रहास्तव ‘शक्तीमान’ आणि ‘चाणक्य’ या मालिकाही सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच ‘ब्योमकेश बक्शी’ ही मालिकाही सुरू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक लोकप्रिय मराठी मालिकादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका म्हणजे ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’.
प्रसिद्ध विनोदी मराठी लेखक चिं.वि. जोशी लिखित चिमणराव यांच्या लेखनावर आधारित ‘चिंमणराव आणि गुंड्याभाऊ’ ही मालिका मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात येत होती. या मालिकेला त्यावेळी अफाट लोकप्रियता मिळाली होती. मध्यमवर्गीय लोकांच्या सरळसाध्या आय़ुष्यातील प्रसंगांमधून उमलत जाणारे निर्मळ विनोद हे लोकांना खूप आवडत. ज्येष्ठ मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी चिमणरावांची भीमिका साकारली होती. त्यांची पत्नी कावेरीला ‘काऊ… ए काऊ’ अशी हाक मारण्याची पद्धत लोकप्रिय झाली होती. तसंच बाळ कर्वे या अभिनेत्याने साकारलेली ‘गुंड्याभाऊ’ ही व्यक्तिरेखादेखील लोकांनी डोक्यावर घेतली होती.
लॉकडाऊनच्या काळात सह्याद्री वाहिनीवर पुन्हा ही सारी गंमत अनुभवता येणार आहे. ही मालिका संध्याकाळी ७.३० वा. आणि रात्री १०.०० वाजता पाहता येणार आहे.