चीनने मागितली जाहीर माफी, कोरोनाला वेळेत रोखणं होतं शक्य

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाने इटलीमध्ये जास्त बळी घेतले आहेत. कोरोनाचा धोका भारतातही मोठ्या प्रमाणावर आहे. जगाला कोरोनाचा त्रास देणाऱ्या चीनविरोधात भारतातील काहीजणांनी तक्रारदेखील दाखल केली आहे. डॉ. ली वेनलियांग यांनीच पहिल्यांदा कोरोनाचा जगाला धोका असल्याचं सार्वजनिक केल्याबद्दल त्याच्याविरोधात सरकारने कायदेशीर कारवाईकेली होती. मात्र आता त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे.
डॉ. ली हे वुहान शहरातल्या सरकारी रुग्णालयात कार्यरत होते. डिसेंबर २०१९ मध्येच त्यांनी कोरोनाबद्दल भीती व्यक्त केली होती. विचित्र प्रकारच्या तापाने ७ जण मेल्याचं त्यांनी पाहिलं आणि हा ताप साधासुधा ताप नसून कोरोना असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांनी डॉक्टरांच्या Whatsapp ग्रुपवरदेखील माहिती टाकली होती. हा मेसेज व्हायरल झाला होता. तेव्हा चीन सरकारने त्यांना धमकावत गप्प बसण्यास सांगितलं. अफवा पसरवण्याचा आरोप करत त्यांना अटकदेखील केली होती. नंतर जरी त्यांना सोडून दिलं असलं, तरी तोपर्यंत चीनमध्ये हजारो लोक तोपर्यंत कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. या डॉक्टरांचा स्वतःचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्तही नंतर प्रसिद्ध झालं.
या सर्वांमुळे कोरोनावर वेळेत जागृती होऊ शकली नाही. आज त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागत आहे. अखेर यासंदर्भात आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं मान्य करत चीन सरकारने ली कुटुंबियांची जाहीर माफी मागितली आहे.