औरंगाबाद शहरात दहावी आणि बारावीचे वर्ग भरणार

राज्य सरकारने येत्या सोमवारपासून पहिले ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, औरंगाबाद महापालिका हद्दीतील फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत, तर पहिले ते नववीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. तर औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोरोना लस घेणे बंधनकारक झाले आहे. कोरोना लस घेतली नसेल तर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही.
औरंगाबादमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यबाबत प्रशासनाने काही अटी घातल्या आहे.
काय आहेत अटी?
- सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असण बंधनकारक आहे.
- शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.
- गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही.
- विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून लेखी संमती आवश्यक आहे.
- विद्यार्थी, शिक्षक कोरोनाबाधित आढळल्या शाळा निर्जंतुकीकरण करावी, विद्यार्थ्याला विलगीकरण करावे.
- कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार आहे.