Mon. Jan 24th, 2022

घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

उकाडा असल्याने अंगणात झोपणे सांगलीतील 3 महिलांच्या जीवावर बेतलं आहे.

शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडली आहे.

आकस्मिक घटनेत एकाच कुटुंबातील 3 महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खानापूर तालुक्यातील मोही गावात रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली.

हौसाबाई विष्णू खंदारे, कमल नामदेव जाधव, सोनाबाई विष्णू खंदारे अशी मृत महिलांची नावे असून या माय-लेकी आहेत.

नेमकं काय घडलं ?

रात्री प्रचंड उकाडा असल्याने हे सर्वजण आपल्या पत्र्याच्या घरासमोरील पटांगणात झोपले होते.

झोपण्याच्या जागी डोक्याकडील बाजूला शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत होती, जी रात्री अचानक कोसळली.

यात भिंतीच्या शेजारी झोपलेल्या तिघींच्या डोक्यावर ढिगारा कोसळला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत सावित्री तुळशीराम हसबे या जखमी झाल्या असून त्यांना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *