Tue. Mar 2nd, 2021

कोरोनाचा राज्यात पहिला बळी गेला आहे. कस्तुरबा रुग्णालयात ६४ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील अनेक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोणकोणते मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

मुंबई

मुंबईकरांचा आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाचं मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

कोरोनामुळे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद

पुणे

राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही १६ वर पोहचली आहे. यामुळे दगडूशेठ गणपती आणि कसबा गणपती मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा पहिला बळी

राज्यभरातून दगडूशेठ गणपती आणि कसबा गणपती मंदिराला भाविक भेट देत असतात. परंतु दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर देखील आजपासून बंद केलं जाणार आहे. हे मंदिर लाखो वारकरी भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. पुढील आदेश येईपर्यंत वारकऱ्यांना तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार नाही.

कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी बैठक होणार आहे.

बीड

मराठवाड्यातील बीडमध्ये सोमवारी रात्री 11 वाजल्या पासून धार्मिक स्थळांना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिर आज रात्री 11 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतला आहे.

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, मशिदी, शाळा, कॉलेज, लग्न समारंभ परीक्षा अशा जमाव आढळल्यास या सगळ्यांवर जमाव बंदी करण्यात येणार आहे.

अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेले श्री मयूरेश्वर मंदिरदेखील मंगळवारपासून बंद राहणार आहे. मोरगांव ग्रामपंचायतच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोरगाव येथील श्रींच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलाय.

पंढरपूर

पंढरपुरात विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अन्नछत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून फूड पॅकेटमधून प्रसाद मिळणार आहे.

या प्रसादाचा दररोज हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेतात. कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांची माहिती दिली आहे.

नाशिक

शिर्डीचे साईबाबा मंदीर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाने घेतला आहे. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ही माहीती दिली आहे.

पुढील निर्णय येई पर्यंत मंदीर भाविकांसाठी बंद राहणार आहे. साई संस्थानच्या इतिहासातील मंदीर बंद ठेवण्याची ही पहीलीच वेळ असेल .

दरम्यान राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत ३१ मार्चपर्यंत जमावबंदी जाहीर केली आहे.

कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा १२८ वर पोहचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *