Corona : शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार

जगावर कोरोनासारखं संकट ओढावलं आहे. भारतात कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. राज्यात शंभरीच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार आपला एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत. याबाबतची माहिती राज्यसभा खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईतील हा खारीचा वाटा असल्याचं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचं हे युद्ध आपण नक्की जिंकू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील मदत करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि खासदार आपल्या एका महिन्याचा पगार मदत म्हणून देणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीचे दोन्ही सभागृहातील आमदार हे आपला एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. तसेच खासदार हे पंतप्रधान निधीत आपला महिन्याचा पगार जमा करतील, अशी माहिती शरद पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांनी महिन्याच्या वेतनाचे धनादेश हे जयंत पाटील यांना दिले जावे, असंही या निवेदनात म्हटंल आहे.
कोरोनासारख्या या अभूतपूर्व संकटात जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने हा निर्णय घेतला आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.