आता ५ मिनिटांत कोरोना तपासणीचा कळणार रिझल्ट

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या हा राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाबाधितांची तपासणी हा सर्वांत महत्त्वाचा भाग असून त्यासाठी यंत्रणा तितकीशी वेगवान नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. मात्र आता रॅपिड टेस्टिंगला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत कोरोना तपासणीचा परिणाम कळू शकणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात डेडिकेटेड हॉस्पिटल्स असावीत, यासाठी सरकारने तयारी केली आहे. जेथे रुग्णांची संख्या वाढत आहे, तेथे कडक कारवाई करण्यात येणार आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही, अशी सूचनाही देण्यात आली आहे. निजामुद्दिनसारख्या घटना महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यावेळी कोरोनाच्या तपासणीवर जास्त भर देण्यासंदर्भात चर्चा झाली. ज्याठिकाणी कोरोनाबाधितांची जास्त संख्या आढळून आली, तेथे ड्रोनसदृश डिजिटल टेक्नोलोजीचं सहाय्य घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.