त्याच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

राज्यात कोरोनाने उन्माद माजवलेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधित 39 रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक अफवा देखील समाजात पसरत आहेत.
आता अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र तरीदेखील या निर्णयाकडे लोक गार्भियांने पाहत नसल्याचे पहायला मिळत आहेत. नुकतीच लातूरमधील अशीच एक अफवेची घटना समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
लातूर जिल्ह्यातील रामेश्वर रुई या गावातील अनंत कराड हे कामासाठी तीस वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. तीस वर्षानंतर पहिल्यांदाच गावातील लग्नासाठी ते 12 तारखेला गावाला आले.
सोमवारी दुपारी एक वाजता अचानक त्यांचा मृत्यू झाला. गावी आल्यावर सर्दी तापाने ते आजारी होते. गावात अनंत कराड यांना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला,अशी बातमी सर्वत्र पसरली.
यामुळे हळूहळू गावातील लोक गाव सोडून शेतात निघून गेले. पोलीस प्रशासन आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली.
गातेगाव पोलीस ठाण्यातील पोलिस सोमवारी संध्याकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साडे सहा वाजता मृतदेह गावातून उचलून लातूरच्या शासकीय रुग्णालयात आणला.
लातूर येथील वैद्यकीय पथकाने सर्व काळजी घेत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट आल्यानंतर सत्य बाहेर येईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र अनंत कराड यांच्या मृत्यूने गावात मात्र अनेकांना घाबरवले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.