#Coronavirus : आंदोलनं होत आहेत, पण ‘अशी’!

कोरोनाचा परिणाम आंदोलनांवरही दिसून आला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. अनेक दिवसापासून संचालक मंडळांनी आश्वासनाची पूर्ती न करता विश्वासघात केला आहे, असं सांगत कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करत संपाचा इशारा दिला आहे. मात्र आंदोलक साडेतीन फूटावर तोंडाला मास्क लावून घोषणा देत असल्याचे चित्र बीड मध्ये पाहायला मिळालं.
तसंच या आंदोलनामध्ये जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र, या आंदोलनावर कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. या कर्मचारी संपाचा बँकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे.
कर्ज आणि अनुदान या विषयांवर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचा शेतकऱ्यांनाही फटका सहन करावा लागणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बँक व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या संदर्भात दुर्लक्ष करत आहे म्हणून हे आंदोलन करत असल्याचे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप माने यांनी सांगितलं.