#Coronavirus : कर्मचाऱ्यांचं किमान वेतन कापू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र जनतेकडून सहकार्य अपेक्षित असल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाद्वारे पुन्हा एकदा जनतेला गर्दी टाळण्याचं आवाहन केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
गर्दी आता खूप कमी झाली असली, तरीही काळजी घेण्याची गरज आहे.
रेल्वे, बस या शहराच्या मुख्य वाहिन्या आहेत. त्या बंद करणं सोपं आहे. मात्र महत्त्वाच्या सेवा पुरवणाऱ्यांचं काय करायचं असा प्रश्न उद्भवतो. त्यामुळेच बँका आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहतील.
जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांव्यतिरिक्त मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांत 31 मार्च पर्यंत सर्व बंद राहील.
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती यापूर्वी 50 टक्क्यांवर आणली होती, ती आता 25 टक्क्यांवर आणण्यात येत आहे. खासगी क्षेत्रालाही हेच आवाहन आहे. त्याला प्रतिसाद जरी मिळत असला, तरी अजूनही काही कार्यालयांमध्ये कामं सुरू आहेत. हे बंद न झाल्यास सरकारला बंद करावं लागेल.
संकट येतं आणि जातं. पण माणूसकी सोडू नका, असं म्हणत उद्योगक्षेत्राला करत ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांचं किमान वेतन कापू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.