Sun. Apr 11th, 2021

कोरोना काळात गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ

कोरोना काळात विविध कारणांमुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून जन्मत: अर्भक मृत असण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातून ही बाब स्पष्ट झाली असून प्रामुख्याने भारतासह विकसनशील देशात गर्भवती महिलांचे कोरोनाकाळातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या लेखात म्हटले आहे. महाराष्ट्रातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णोपचारात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे मृत्यू अधिक झाल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

एकूण १७ देशांमध्ये ४० अभ्यासगटांनी याबाबत गोळा केलेल्या तपशिलातून कोरोना काळातील गर्भवतींचे जास्त मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बुधवारी ‘लॅन्सेट’मधून ही बाब प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनाबाधित गर्भवती महिला तसेच वेगवेगळ्या संसर्गाने आजारी असलेल्या महिला, त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात आलेले अडथळे या सर्वांचा विचार या अभ्यासात करण्यात आला आहे.

अभ्यासकांना प्रामुख्याने अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशात आरोग्यव्यवस्थेत कोरोनामुळे निर्माण झालेल्या उपचारातील अडचणी तसेच संसर्गाच्या भीतीमुळे अनेक गर्भवती महिलांचे, तसेच अर्भक जन्मत: मृत झाल्याचे आढळून आले आहे. जवळपास बाराहून अधिक अभ्यासांत जन्मत: अर्भक मरण पावल्याच्या प्रमाणात २८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले, तर गर्भवती असताना तसेच बाळंतपणाच्या काळात मेक्सिको आणि भारतात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *