आर्यनसोबत फोटो काढण्यासाठी पोलीसांची गर्दी

क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी आर्यन खानची २८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाल्यामुळे शाहरुखच्या निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच शाहरुखच्या अनेक चाहते तसेच आर्यनच्या मित्रपरिवांनी मन्नतजवळ गर्दी केली. मात्र, आर्यनच्या सुटकेनंतर शाहरुखच्या चाहत्यांनी जो काही जल्लोष केला तो निव्वळ लाजिरवाणा होता. आर्यनची एक झलक पाहण्यासाठी कारागृहाबाहेर कमालीची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे आर्यनसोबत फोटो काढण्यासाठी पोलीस कर्मचारीसुद्धा एकमेकांना ढकलताना दिसत होते. त्यातील एक हसणारा चेहरा तर कमालीचा आक्षेपार्ह आहे.
आर्यन केवळ शाहरुखचा मुलगा आहे म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आर्यनची अटक ही अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी झाली होती याचा पोलीस कर्मचाऱ्यांना विसर पडावा हे खेदजनक आहे.
आर्यनची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी कारागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणत गर्दी झाली होती. तसेच यावेळी शाहरुखच्या समर्थकांनी आर्यनवर अन्याय झाल्याचा दावासुद्धा केला आहे. विशेष म्हणजे आर्यनला कारागृहाच्या दारावर सोडायला आलेल्या कारागृहाचे कर्मचाऱ्यांचीच गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.
क्रुझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीनसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे उशीरा पोहचल्यामुळे आर्यनला कालची रात्रसुद्धा तुरुंगातच काढावी लागली. आणि अखेर २८ दिवसांनी आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे.